श्रेष्ठ दान गोदान

श्री. गजानन ल. पळसुलेदेसाई
( कार्याध्यक्ष – नवजीवन विकास सेवा संस्था )

प्रास्ताविक -

भारतीय संस्कृतीत गोदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक मंगलकार्यात, संस्कारात, व्रतवैकल्यात, जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक कार्यात गोदान महत्त्वाचं मानलं गेलं आहे. गोदान केल्यामुळं संपत्तीशुद्धी, आरोग्यवृद्धी, मृतात्म्यांना शांती, लौकिक यश आणि प्रसिद्धी अन सर्वात महत्त्वाचं म्हणजे सश्रद्ध भाविक मनाला, अध्यात्मिक श्रद्धेने मन:शांती मिळते. परंपरेने व धार्मिक श्रद्धेनुसार सांगण्यात आलेलं हे गोदानाचं महत्त्व ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत श्रद्धेनुसार मान्य करावं लागतं. 'नवजीवन' संस्थेने अशा प्रकारचं गोदान स्विकारण्याची सिद्धता केलेली आहे. गोदानाची इच्छा असणा-या दात्याला सर्वतोपरी सहकार्य करून भारतीय गोवंश संवर्धन अभियान संस्था चालवत आहे. गोदानाच्या विविधांगांसह अनेक बाजूंवर प्रकाशझोत टाकणारा लेख....

भारत हा कृषीप्रधान देश असून यांत्रिकीकरणाच्या काळातही बैलांच महत्त्व अबाधित आहे. तुकड्या तुकड्यांत विभागलेली जमीन अजूनही बैलांमार्फतच कसली जाते. भारताच्या विविध प्रांतातील तब्बल २६ ते ३८ वंशाच्या गायी 'शुद्ध भारतीय गोवंश' म्हणून ओळखल्या जातात. भारतात गायींच्या जातीत जेवढं वैविध्य आहे तेवढं अवघ्या जगात नाही. प्राचीन काळी 'गोधन' व्यवहारासाठी फार महत्त्वाचं मानलं जायचं. सध्या ज्याप्रमाणे चलनात सोनं अमूल्य त्याप्रमाणे पूर्वी गोधन होतं. प्राचीन काळानंतर गायीनंतर शेळी, मेंढी, म्हैस, घोडा, डुक्कर यांचाही चलन म्हणून वापर झाला. अर्थात व्यवहार मूल्यासाठी माणसानं पशूंचा आधार घेतला मात्र गायीला परंपरेनेच नव्हे तर चार वेद, श्रुती, स्मृती, पुराणांनी गायीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं. भारतात. जाती, पंथ, विचारप्रवाह भिन्न असले तरी गायीचा गौरव सर्वांनीच केला आहे. कृषीप्रधान असलेल्या भारतात गोमातेचा गौरव होणं हे यथायोग्यच.

माता रुद्राणां दुहिता वसूंनां स्वसादित्यांना ममृतस्य नाभि:
प्रनुवौचं चिकितुरषे जनाय मागामनागा मदितिं वधीष्ठा (ऋग्वेद)
( गाय ही रुद्र देवतेची माता आहे. वसुदेवतेची पत्नी आहे आदित्याची बहिण आहे, अन् अमृताची झरी आहे. ) कृषी संस्कृती आणि ऋषी संस्कृती या दोघांनीही गायीला सर्वश्रेष्ठतेची उपाधी दैऊन 'दान' देण्यासाठी भेटवस्तू म्हणून 'गाय' अमूल्य वस्तू मानली.

गोदानाचं सर्वात महत्त्वाचं फळ म्हणजे संपत्तीशुद्धी. 'याज्ञवल्क्य' स्मृतीने 'दान' प्रकरणातील २०८/२०९ व्या श्लोकात तसा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. या बरोबरच आरोग्य-आयुष्यवृद्धी, मृतात्म्यांना शांती आदी फलप्राप्तीसाठी गोप्रदान श्रेष्ठदान म्हणून गौरवलेलं आहे. गोप्रदानाची प्रशंसा यमस्मृती, अनुशासन, महाभारत, याज्ञवल्क्यस्मृती आदी ग्रंथ व श्रुतीस्मृतीनीं केली आहे. काळ्याकुट्ट रंगाची किंवा पिंगट कृष्णवर्णाची गाय म्हणजे 'कपिला गाय' अशी गाय दान केल्यास मृत्यूनंतर मृतात्म्याला परलोकगमन करताना यमपुरीतील 'वैतरणी' नावाची तप्त ज्वालारस उकळते पाणी असलेली नदी पार करताना त्या जिवात्म्याला त्रास होत नाही. प्रसूत झालेली, सवत्स (वारसासह) गाय दान दिल्यास पुण्यप्रद, परंतु प्रदक्षिणापूर्वक दान दिल्यास पृथ्वीप्रदक्षिणेसह पृथ्वीदानाचेच फळ मिळते. यज्ञयाग करून देवता सिद्धी होते, तप:श्चर्या करून आत्मशुद्धी होते; मात्र गोदान केल्यास आत्मसुख, मन:शांती मिळते, मृतात्मे तृप्त होतात, देवांना परमानंद होतो. दान करणा-याच्या मृतात्म्यांना यमपुरात महत्त्व प्राप्त होते; त्यांची स्वर्गाकडे वाटचाल सुरु होते. गायीच्या अंगावर जेवढे रोम (केसांची रंध्रे) असतील तेवढी वर्षे जीवात्मा स्वर्गात आनंदाला प्राप्त होतो. भारतात प्राचीन काळात कृषीयुगाचा सुवर्णकाळ असताना गायीला इतकं महत्त्वं होतं.

माणसांच्या जीवनात पशूंना आपोआपच स्थान दिलं गेलं. आनंदाची पर्वणी म्हणजे दिवाळी सण. या सणाची सुरुवातच गोवत्स-दवादशीनं होते. वसुबारस म्हणजेच गोवत्सदवादशी. गाय व बैलांचा बारसाच जणू हा दिवस दिवाळीला गोड-धोड खाण्यापूर्वी आपणाला ज्या गाय-बैलांमुळे हे धनधान्य-पीक मिळाले त्यांच्याशी आपण कृतज्ञता व्यक्त करतो. गाय बैलांकडे (पुढील काळात त्यात म्हशीचाही समावेश मध्ययुगात झाला.) कुटुंबातील सदस्यच म्हणून पहायला भारतीय संस्कृती शिकवते. भारत देशाला थोर संस्कृती आहे. दिलीप राजानं गाईला वाचण्यासाठी सिंहापुढं स्वत:चा देह ठेवला ही कथा सर्वश्रुत आहे. राष्ट्राला जेव्हा नवी दृष्टी, नवे ध्येय द्यायचे असते तेव्हा सर्वस्वाचे बलिदान करावे लागते. प्राचीन काळात दिलीप राजानं गोसेवेचं ध्येय व दृष्टी दिली. दिलीप राजासारख्या थोर राजामुळेच भारतीय संस्कृतीचा अगाध महिमा आज टीकून आहे.

गायीच्या दुधाला व तूपाला आयुर्वेदीयदृष्टया महत्त्व आलेलं आहे. म्हशीचं दूध पचायला जड असतं. म्हैस, शेळी, मेंढी पाण्याने युक्त असलेला जड चारा खातात, मात्र गायीचा आहार समतोल असतो. अनेक अशा वनस्पती, प्रत्येक ऋतुतील चारा अशा आहारामुळं पंचवायू आणि पंचमहाभूतांपासून तयार झालेलं अन्न म्हणजे गोदुग्ध! एक परिपूर्ण आहार. गाय शेतीसाठी बैल देते. आबालवृद्धांसाठी पाचक सुमधुर दूध देते. यासाठीच वेदकाळात व आजही गायीला गोमाता मानले जाते. गाय ही सृष्टीची जणू देवता आहे अशी कल्पना त्यात आहे.

माता किंवा देवता पाल्यांची, शक्तांची काळजी घेतात, मायेची पाखर घालतात. 'गोमूत्र अर्क' जलोदरापासून रक्तशुद्धीसाठी औषधी गुणकारी आहे. गोवंश अनुसंधान केंद्र, नागपूर, गो-विज्ञान केंद्र-पुणे यांच्यासारख्या संस्थानी आय.एस.ओ, आणि विविध देशांसाठी पेटंटस् मिळवली. गोमय म्हणजेच गायीचे शेण, साक्षात लक्ष्मीचा वास. देवघरात वा ओटी-पडवीवर सडासंमार्जनासाठी गोमय फारच पवित्र. ते समाशितोष्ण असते, वातावरणातील, जमीनीतली उष्णता गायशेण शोषून घेते. मलशोषकता मलदुर्गंधीनाशक, शाश्वत उर्जा देणारे आहे. यासाठीच गोमयापासून साबण, दात, त्वचारक्षक औषधे बनवली जातात. 'गोमूत्रअर्क' तर गुणकारी औषधच आहे.

यासाठीच वेदकाळात अनेकदा वैद्यबुवा रुग्णांना गायींच्या कळपात ठेवत असत. 'लीव्हींग वीथ काऊ' हा पाश्चात्य प्रकार आता रुढ होत आहे. गोवंशाधारीत पर्यटन ही संकल्पना एखादी संस्था अजूनही सुरु करु शकेल भारतात. वेदकाळात गायींची मिरवणूक व शोभायात्रा काढली जायची.

गावो ममाग्रत: संतु गावो मे सन्तु पृष्ठत: |
गाव: शिरसी मे नित्य गवांमध्ये वसाम्यहम || या श्लोकांमध्येच गायीच्या सहवासाचे महत्त्व वर्णन केले आहे.

गाय सर्वांना संगोपनातून, दूधातून माया देतात. सर्वांच्या संवर्धनास गाय कारणीभूत होते. दूध देताना गाय आपपरभाव ठेवत नाही. गाय दूध हे पृथ्वीतत्त्व आहे. दही हे भुवलौक (अपतत्त्व) म्हणून प्रसिद्ध आहे. कारण दूधामध्ये आप (पाणी) जड वायू (आम्ल) याचे विघटन झाल्यामुळे दही बनते. भूवर्लोकात जड वायू आहे. 'तूप' हे स्वर्लोक (अग्नी) म्हणून प्रसिद्ध आहे. तेजोमय ठिकाणात देवता वास करतात, मंथन व घर्षणातून अग्नी निर्माण होते, उष्णतेनं तूप बनते, तूपाचे हवन केल्यामुळं देवता तृप्त होतात. यासाठीच आयुर्वेदानं अन् आजकालच्या डाएटवाल्यांनीसुद्धा गाय तूप वर्ज्य मानलेलं नाही. 'गोमय' म्हणजे गायीच्या शेणात किरणोत्सर्ग रोखणारे गुणधर्म असल्याबाबत विविध दावे झालेले आहेत. (संदर्भ – जपान भूकंप व विविध वृत्ते ). जंगलभर फिरणा-या गायी आयुर्वेदाने सर्वश्रेष्ठ मानल्या आहेत. नवजीवन गोशाळेतील गायी यासाठीच जास्तीत जास्त जंगलात चरायला, फिरायला सोडल्या जातात.

"मातर: सर्व भूतानां गाव: सर्व सुखप्रदा |"
गायी सर्वांचे संगोपन करतात. गाय मारणे म्हणूनच निषीद्ध आहे सर्व ग्रंथांसह प्राचीन ऋषीमुनींनी 'गोहत्त्या" मातृवधाप्रमाणे मानली.

गवां सेवा तु कर्तव्या गृहस्यै: पुण्यलिप्सुभि: |
गवां सेवा परो यस्तु तस्यं श्रीवर्धने चिरात् ||

गोसेवेचे महत्त्व यात सांगितलेलं आहे गोसेवेत कार्यरत असणा-यांचे कल्याण होत याचे यात वर्णन केले आहे. आपण सर्व मर्त्य मानव चंगळवादाचे बळी आहेत. प्रत्येक धर्मकार्याच्या सुरुवातीला गोमूत्र, गोमय, गोदुग्ध, दही, तूप, या सर्वासह पंचगव्य प्राशन करण्याची परंपरा एक प्रायश्चित्त म्हणून सांगण्यात आली आहे. देहशुद्धी, मन:शुद्धी यासाठी हा विधी सांगण्यात आलेला आहे. अर्थात भ्रष्टाचार, घोटाळे, असंख्य भानगडी पर्यावरण दूषितता अशा आसमंताला प्रदूषित करणा-या वातावरणात आपण काय काय म्हणून शुद्ध करणार? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. जीवन जगत असताना दररोज कार्यालयापासून समाजातही आपण तडजोडी करतच असतो. शील, चारित्र्य, धन, वस्तू अगदी पोटच्या मुलांनाही पैजेवर, डावावर लावायला मागेपुढं पाहिलं जात नाही. जीवनकलहात आपण एक एक जगणं सुसह्य व्हावं म्हणून एक एक मरण रोज मरतो.

जगण्याचा सन्मान दानात असतो, त्यागात असतो असं सांगतात. आज आपण सर्वचजण 'कलियुग' नावाच्या युगात जगतो आहोत. हे युग आपल्या नावाप्रमाणं आहे. या युगात धर्माचे महान व सुंदर, मंगल लक्षण म्हणजे दान! अर्थातच 'याज्ञवल्क्य' स्मृतीत 'दान' प्रकरणात 'गोप्रदान-गोदान' सर्वश्रेष्ठ दान सांगितले आहे. तीर्थस्नान, ब्राह्मणभोजन, महादान, हरिसेवा, सर्वव्रतोपासना, सर्वतपसाधना, भूप्रदक्षिणा, सत्यवचन या सर्वामुळे जे पुण्य मिळते तेच सर्व पुण्य गोप्रदान केल्यामुळे 'गोदान' करणा-याला व स्विकारणा-याला मिळते. अर्थात 'गोदान' करताना गाय कशी असावी याबाबतीत अनेक निकष आहेत. दोषयुक्त नसावी, चोरलेली नको, हडकुळी, वांझ, रोगट नसावी वगैरे. धष्टपुष्ट, दुधाळ व निरोगी गाय दानासाठी सर्वोत्तम सांगितली आहे. 'दान' देताना गाय कशी दान करावी याचेही शास्त्र, पद्धत, रिती सांगितल्या आहेत. गोप्रदान हे दक्षिणेसह करावे असा संकेत आहे. सध्याच्या काळात दक्षिणेऐवजी चा-यासाठी वा कायमस्वरुपी गायीचा प्रतिपाल होईल अशाप्रकारचे चराऊ कुरण ( गोचर भूमी विकास ) करण्यासाठी "गोग्रास निधी" दिला तर ते काळाला धरून संयुक्तीक ठरेल. गोदान घेणारा फक्त दूधाचाच लोभी नसावा तर गोसेवक असावा, गोधनप्रेमी असावा हाही संकेत आहे.

भारतीय गोधन झपाट्याने घटत आहे. काही जाती तर नष्ट होण्याच्या वाटेवर आहेत. संकरीकरणाच्या लाटेत मूळ, कसदार वंश आता दुर्मिळ होऊ लागले आहेत. संकरीत वंश, बियाणी रोगाला लवकर बळी पडतात हे समाजाला आता कळायला लागले आहे. संकरीत बियाणी, संकरीत वंश शेतीला, शेतक-यांना घातक ठरताना जगभरात 'मूळ वंश बचाओ ( सेव्ह दी ओरीजीनल ब्रिडस् अन्ड सीडस) अशा अभियानांतून नव्या चळवळी जन्म घेत आहेत. 'गोदान' चळवळ अशाच एका उदात्त अभियानासाठी 'नवजीवन' संस्थेनं हाती घेतली आहे. मूळ गोवंश टिकवणे, वंशसातत्य टिकवणे, शुद्ध गुणधर्मांचे संवर्धन यासाठीच 'भारतीय गोवंशसंवर्धन अभियान' आहे. सज्जन व समर्थ नागरिकांनी किंवा समर्थ-सज्जनांनी, संपन्न-प्रसन्न धनीक, गृहस्थांनी गोदानासाठी कार्यरत होणे ही आजच्या काळाची गरज आहे.