"गीर" गोवंश (गुजरात)

आपल्या भारतीय गोवंशामध्ये दूध उत्पादनासाठी जे गोवंश प्रसिद्ध आहेत त्यापैकी सर्वोत्तम गोवंश म्हणून सिद्ध झालेला "गीर" गोवंश आहे. आपल्या देशामध्ये गुजरात राज्याचा पश्चिम व दक्षिण भाग, महाराष्ट्र राज्याचा गुजरातच्या सीमेलगतचा प्रदेश तसेच राजस्थान राज्यामधील टोंक व कोट जिल्हे हे गीर गोवंशाचे उगमस्थान मानले जातात.

शारीरिक ठेवण

या गोवंशाच्या गायी थोराड, उंच व भक्कम बांधण्याच्या असतात. नजरेत भरेल अशी शारीरिक ठेवण असते. भक्कम मोटे व भरदार डोके, शिंगे गोलाकार व मागून पुढे आलेली बुंध्यापासूनच जाड व बहुतांशी काळ्या रंगाची असतात, कान लांबलचक खाली पडलेले व नाकपुडी पर्यंत पोचणारे असतात, कानाच्या पाळ्यांचा रंग कडेला गडद काळसर छटेचा असतो, नाकपुडी संपूर्णपणे काळीभोर असते व चेह-याचे मानाने लहान असते, डोळे लंबट गोल व काजळ घातल्यासारखे व अतिशय बोलके असतात, वशिंडे मोठे व घट्ट आकर्षक असते, गायींच्या मानेखाली पोळी ( लोळी) मोठी असते, पाय मोठे व भक्कम असतात, खूप काळे उंच व एकसंध असल्यासारखे दिसतात, मागे चौक उतरते नसतात, गायी कोठीपोटात आखुड नसतात, लोंबी मोठी असते. छातीकडून कासेकडे जाणा-या दूधाच्या शीरा सुस्पष्ट व नागमोठी असतात, गायींची कासेची ठेवण मोठी व शरीराबाहेर जास्त असते, चारही स्तन लांबटगोल व समान अंतरावर असतात. शेपूट लांबलचक व गोंडा काळसर झुपकेदार असतो, निरण (सोवाळी) काळी व सैलसर ठेवणीची असते. रंग बहुतांशी तांबडा व त्यामधील विविध छटांचा असतो, क्वचित ठिपके असतात.

या जातीचे बैल गायींप्रमाणेच धष्टपृष्ट व थोराड असतात, बैलांचे मस्तकाची ठेवण चेह-याचे मानाने मोटे व नजरेत भरणारी असते. बैलांमध्ये वशिंड मोठे व घट्ट आणि गडद अशा काळसर छटेचे असते, बैल लाबपौंडी असतात, बैल अत्यंत शांत व सुस्वभावी असतात मारकेपणा क्वचीतच आढळतो, बैल ओढकाम शेतीकामासाठी चांगले असतात पण जरा मंदपणे चालतात.

पूर्ण वाढ झालेल्या गायीचे वजन साधारण: ३५० ते ४०० कि. ग्रॅ. असते आणि पूर्ण वाढ झालेल्या बैलाचे वजन ४५० ते ५५० कि. ग्रॅ. पर्यंत असते. पूर्णवाढ झालेल्या गायी व बैलांची मापे साधारणत: पुढील प्रमाणे असतात.

शरीराची उंची छातीजवळील लांबी घेर

1) बैल १४५ ते १४५ ते १८० ते १५५ सें.मी. १५५ सें.मी. २१० सें.मी

२) गाय १२५ ते १२० ते १६०ते १३५ से.मी. १३५ से.मी. १८० सें.मी

या गोवंशाच्या कालवडींचे प्रथम माजावर येण्याचे वय साधारणपणे ३० ते ३८ महिन्यांचे असते. चांगल्या सांभाळलेल्या कालवडी २४ महिन्यांच्या सुद्धा माजावर आल्याची उदाहरणे पाहण्यात आहेत. दुग्धोत्पादनाची क्षमता प्रथम वेतापासन तिस-या वेतापर्यंत आकर्षक चढत्या कमानीची असते. हा गोवंश सलग जास्तकाळ, उत्तम स्निग्धांश व भरपूर दुग्धोत्पादन यासाठीच प्रसिद्ध आहे. सर्वसाधारण मेहनतीवर दिवसाकाठी ६ ते ७ लिटर दूध सहज देतात. आपल्या देशामध्ये दुग्धोत्पादन स्पर्धेमध्ये २४ तासांमध्ये १७ लिटर दूध देण्याची नोंद आहे. सरासरी स्निग्धांश ४.५० ते ५.५० पर्यंत असू शकतो. एका वेतामधील सरासरी दुग्धोत्पादन ३२१० कि.ग्रॅ. मिळते. दोन वेतामधील अंतर १८ ते २४ महिन्यांचे असते. दोन वेतांमधील भाकडकाळ १०० ते १५० दिवसापर्यंत असू शकतो.

अशा उत्तम गुणवत्तेच्या गोवंशावर ब्राझील व अमेरीकेमध्ये संशोधन झाले व त्यातून 'ब्राह्मणी' गोवंश विकसित झाला. या गायी एकाच किणी उत्तम पद्धतीने सांभाळल्यास १० ते १२ वेणी एकाच घरी निश्चित होतात. तसेच चांगली बैलजोडी १५ ते १८ वर्षे उत्तम काम करु शकते. या जातीची खोंड वयाच्या तिस-या वर्षापासून शेतीकामात हळूहळू धरण्यास योग्य असतात.

  1. 1.या जातीचा वळू निश्चित करतात पुढील निकष आवर्जून लक्षात घ्यावेत.
  2. 2.वळू पासून मिळणारे मादी वासरांचे प्रमाण.
  3. 3.उपजत वासरे उत्तम वाढीची व निकोप असणे गरजेचे आहे.
  4. 4.गोवंशाची सर्व चिन्हे वासरांमध्ये संक्रमीत होणे.
  5. 5.मादी वासरांचे प्रथम माजावर येण्याचे वय.

दारात गीर गाय दूधासाठी असणे हे भारतीय शेतक-याचे दृष्टीने लैकिकार्थाचे चिन्ह आहे

गीर गाई - पुरवठा - माहिती
गीर कालवड - विक्री - माहिती