संस्थेविषयी थोडेसे

नवजीवन विकास सेवा संस्था निसर्गसंपन्न व समृद्ध असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील धडपडणा-या युवकांच्या व शिक्षकांच्या चळवळीला आलेलं मूर्त स्वरुप म्हणजे 'नवजीवन विकास सेवा संस्था'. रायपाटण या राजापूर तालुक्यातील प्रगतशील गावात संस्थेची २६ नोव्हेंबर २००९ रोजी नोंदणीकृत होऊन स्थापना झाली.

(रजि. नं. ३९३१/महाराष्ट्र-रत्नागिरी) सुरुवातीच्या काळात म्हणजे १९९९ ते २००४ दरम्याने 'आर्यादुर्गा अभ्यास परिवार' या नावानं इ. ४ थी, इ. ७ वी. शिष्यवृत्ती परीक्षांसाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक प्रबोधन, जाणीव जागृती व्याख्याने, प्रश्नपत्रिका निर्मिती आदी उपक्रम संस्थेने केले. शिक्षण आणि शेती ही दोन क्षेत्रे संस्थेच्या केंद्रस्थानी असून 'शिक्षणातून शेतीकडे व शेतीतून शिक्षणाकडे' अशी संस्थेची मनोधारणा आहे. बदलत्या कोकणच्या पार्श्वभूमीवर उत्पादक व नगदी पीकांच्या माध्यमातून शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, दत्तक गाव, भारतीय गोवंश संवर्धन, संगणक व्यवहार आणि आनंददायी, प्रकल्पाधारीत शिक्षण या माध्यमातून संस्था समाजाला सोबत घेत वाटचाल करीत आहे.'नवजीवन' या संस्थेच्या भारतीय गोवंश संवर्धन अभियानाला आता संस्थात्मक रुप आलं आहे. गोवंशसंवर्धन गोपालन ही स्वतंत्र चळवळ बनली आहे. कोकणातीलच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील गोवंशप्रेमी, गोपालक, गोशाळाचालक, गोवंशाधारीत उत्पादने बनविणारे उत्पादक, निर्यातदार आणि दुग्धव्यावसायिक नवजीवनच्या गोवंशसंवर्धन प्रवाहात सामील होऊन विचार, अनुभव, माहिती यांचे आदान प्रदान करीत सर्व गोवंशप्रेमींचे स्वतंत्र कुटुंबच बनत चालले आहे.